रोडरोमीओंवर मिरज पोलिसांची धडक कारवाई; ४२ दुचाकी जप्त, ₹३३,९०० दंड वसूल
रोडरोमीओंवर मिरज पोलिसांची धडक कारवाई; ४२ दुचाकी जप्त, ₹३३,९०० दंड वसूल.
----------------------------------------मिरज, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने रोडरोमीओ, विनानंबरप्लेट, नंबरप्लेट आणि ट्रिपलसीट दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण ४२ दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून ₹३३,९०० दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
पोलीस पथकाने कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान तसेच शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय परिसरात अचानक नाकाबंदी करून विनानंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेट आणि ट्रिपलसीटने फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी केली. वाहनांची कागदपत्रे व चालकांची ओळख पडताळून संबंधितांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले असून, अशा प्रकारची धडक मोहीम यापुढेही सातत्याने आणि अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. संशयास्पद वाहने किंवा व्यक्तींची माहिती नागरिकांनी तात्काळ डायल ११२ वर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: