ओझरमध्ये 'बॉडी'ची अफवा; तपासात निघाली गादी! पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूने उडाली खळबळ; ओतुर पोलिसांच्या तत्परतेने काही मिनिटांत उलगडले गूढ
ओझरमध्ये 'बॉडी'ची अफवा; तपासात निघाली गादी!पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूने उडाली खळबळ; ओतुर पोलिसांच्या तत्परतेने काही मिनिटांत उलगडले गूढ
आळेफाटा | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील ओझर येथील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती रविवारी ओतुर पोलिसांना मिळाल्यानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. पाण्याच्या मध्यभागी मृतदेहासारखी दिसणारी वस्तू तरंगताना दिसल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने ओतुर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार बाळशीराम भवारी, नरेंद्र गोराणे आणि भरत सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
संशयित वस्तूची खात्री करण्यासाठी पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी व बाळशीराम भवारी यांनी स्थानिकांच्या मदतीने खासगी बोटीने पाण्यात जाऊन पाहणी केली. तपासाअंती पाण्यात तरंगणारी वस्तू मृतदेह नसून गादी असल्याचे स्पष्ट झाले.
या अफवेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या जलद व तत्पर कारवाईमुळे काही मिनिटांतच सत्य समोर आले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
यावेळी ओतुर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रथम पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

No comments: