Header Ads

विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय थांबवा; करवीर तालुका शिवसेनेचे परिवहन विभागाला निवेदन

 , विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय थांबवा; करवीर तालुका शिवसेनेचे परिवहन विभागाला निवेदन.

कोल्हापूर | प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेले एनसी, एमसी आणि स्मार्ट कार्ड काढण्यासाठी महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी गावोगावी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून स्मार्ट कार्ड जागेवरच उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती वृषाली श्रीकांत भोसले यांना निवेदन सादर केले. सध्या स्मार्ट कार्डसाठी तालुका व जिल्हा मुख्यालयातील बसस्थानकांवरच नोंदणी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींसाठी विशेष नोंदणी मोहीम राबवावी, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, आशा सेविका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने गावपातळीवर शिबिरे आयोजित करावीत, तसेच स्मार्ट कार्ड काढण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची यादी व संपर्क क्रमांक प्रत्येक बसस्थानकावर प्रसिद्ध करावेत, अशीही मागणी करण्यात आली.

यावर विभाग नियंत्रक श्रीमती वृषाली भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत सर्व ग्रामपंचायतींना सूचना देऊन गावागावांत स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, सुनील पारपानी, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, दीपक पोपटाणी, प्रकाश मुदुगडे, बाबुराव पाटील, अजित चव्हाण, शिवाजी लोहार, रामराव पाटील, वसंत पोवार, गणेश चावरे, राजेंद्र यादव यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.