१० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! सांगली-मिरज-कुपवाड मनपातील १,१९८ कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाचा मार्ग मोकळा?
१० वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
सांगली-मिरज-कुपवाड मनपातील १,१९८ कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाचा मार्ग मोकळा?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश; आधी १० वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांचा विचार, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत निर्णय.
सांगली | प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील तब्बल १ हजार १९८ कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांपैकी पालिकेत १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत आज झालेल्या विशेष बैठकीत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार राबविण्याचे निर्देश दिले.
या पदांची भरती आणि सेवासमावेशाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना नगरविकास-२ विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज यांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
आधी १० वर्षे सेवा केलेल्यांना संधी
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या आव्हानात्मक असल्याने सर्व १,१९८ कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सेवेत सामावून घेणे शक्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचाच सेवासमावेश करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित
वर्षानुवर्षे महानगरपालिकेत सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे या बैठकीतील निर्देशांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही कधी सुरू होते, याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बैठकीस सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास-२ विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्रा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments: