संत नामदेवांच्या भक्तीमय सोहळ्यात संस्कृतीचा जागर! नामदेव शिंपी समाज व महिला मंडळातर्फे विविध स्पर्धांचा उत्साह; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
संत नामदेवांच्या भक्तीमय सोहळ्यात संस्कृतीचा जागर!
नामदेव शिंपी समाज व महिला मंडळातर्फे विविध स्पर्धांचा उत्साह; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव.
कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे
“भक्ती, संस्कृती आणि महिलांच्या कलागुणांचा संगम” घडवत समस्त दैव नामदेव शिंपी समाज आणि नामदेव महिला मंडळाच्या वतीने ६७६ वा श्री संत नामदेव संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवार, ९ ऑगस्ट रोजी मारुती मंदिर येथे भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
संत नामदेवांच्या विचारांचा आणि संस्कृती-परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने समाजातील सर्व वयोगटांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बालकांसाठी संतांची वेशभूषा आणि चित्रकला स्पर्धा, तर महिलांसाठी पाककला, संतांची वेशभूषा आणि भारुड स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मुक्ताई भजनी मंडळ आणि महालक्ष्मी सोंगी भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनांनी वातावरण भक्तिरसाने भारून गेले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
“महिलांनी उद्योजकतेत आत्मविश्वासाने पुढे यावे”
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध स्त्री उद्योजिका सौ. स्मिता लंगडे यांनी महिलांच्या कलागुणांचे कौतुक करत महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता उद्योग आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अलका बकरे आणि उपाध्यक्षा सौ. कोमल पिसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संध्या हिरवे, वैशाली भाकरे, सरिता भाकरे, प्रतिभा कोळेकर, पूजा वादवणे, अस्मिता मुद्राळे, वैष्णवी मुळे, सिद्धी मिरजकर, राजश्री वादवणे आणि वृषाली जामदार यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग राहिला.
या सोहळ्यासाठी किशोर नाझरे, प्रताप क्षीरसागर, रत्नदीप चोपडे, राजेंद्र बकरे, मदन काकडे, जगदीश बोंगळे आणि किरण कोरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजातील महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सोहळ्याची शोभा वाढवली.
संत नामदेवांच्या भक्तीचा वारसा जपत सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहिला.

No comments: