Header Ads

फरारींचा शोध घेतला अन् १४ आरोपी पोलिसांसमोर हजर!

 फरारींचा शोध घेतला अन् १४ आरोपी पोलिसांसमोर हजर!

----------------------------

सांगली | प्रतिनिधी

----------------------------

सांगली LCBच्या विशेष मोहिमेला मोठे यश; २० प्रलंबित गुन्ह्यांचा तपास होणार गतिमान.

सांगली जिल्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. पारधी समाजातील १२ पाहिजे आणि २ फरारी अशा एकूण १४ आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या संकल्पनेतून ‘पाहिजे, फरारी आरोपींची आत्मसमर्पण योजना’ राबविण्यात आली. LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींचे नातेवाईक व संबंधितांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन केले.

या कारवाईत सांगली शहरातील ७, आष्टा ३, इस्लामपूर ६ आणि कुंडल पोलीस ठाण्यातील ४, अशा एकूण २० प्रलंबित गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांसमोर हजर झाले. पुढील तपासासाठी सर्व आरोपींना संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले.

या विशेष उपक्रमासाठी पोलीस अधिकारी तसेच दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Powered by Blogger.