Header Ads

नवबाग नगरीत ‘श्रीराममय’ वातावरण; ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास हजारोंची गर्दी.

 नवबाग नगरीत ‘श्रीराममय’ वातावरण; ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास हजारोंची गर्दी

भजन-कीर्तन, प्रवचन, गानसेवा आणि महाप्रसादाने रंगला सोहळा; महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांची मांदियाळी.


नवबाग : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या १०८व्या पुण्यतिथी सोहळ्यास श्री क्षेत्र नवबाग येथे ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या, ३ ते १० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड सुरू असलेल्या ‘श्री राम जयराम जय जय राम’ नामजपामुळे परिसर भक्तिमय झाला आहे.

श्री महाराजांच्या पालखीसमवेत दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, संगीतसेवा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर तसेच कर्नाटकातील कागवाड येथील कलाकार आणि भाविक या सोहळ्यात सेवा अर्पण करीत आहेत.

रामनाम तारक होम,

४ ऑक्टोबर रोजी श्री ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ‘रामनाम तारक होम’ पार पडला. या धार्मिक विधीस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.

कोल्हापूरच्या ब्रह्मचैतन्य ग्रुपची गानसेवा

५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपने गानसेवा सादर केली. अभय नेर्लेकर, चंद्रशेखर फडणीस, यशवंत म्हसकर, कविता म्हसकर आणि अश्विनी टेंबे यांनी गीतरामायणातील निवडक गीते, भक्तिगीते आणि अभंग सादर करून भाविकांची दाद मिळवली.

महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती,

पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दररोज हजारो भाविक नवबाग येथे दाखल होत आहेत. वाढत्या गर्दीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

१० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रींचा निर्वाणकाळ असल्याने सोहळ्याच्या अंतिम दिवसांकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे. ‘श्री राम जयराम जय जय राम’ या अखंड नामस्मरणाने नवबाग नगरी दुमदुमून गेली आहे.

No comments:

Powered by Blogger.