Header Ads

ग्रामस्थांना अंधारात ठेवून ग्रामसभा घेतल्याचा आरोप! शिवरा ग्रामस्थांची थेट जिल्हा परिषद CEOंकडे धाव.

 ग्रामस्थांना अंधारात ठेवून ग्रामसभा घेतल्याचा आरोप! शिवरा ग्रामस्थांची थेट जिल्हा परिषद CEOंकडे धाव.

-------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पी. एन. देशमुख

-------------------------------

नोटीस नाही, दवंडी नाही; ग्रामसभेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष!

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा येथे नागरिकांना योग्य माहिती न देता ग्रामसभा घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छक्कम गांधी यांच्याकडे तक्रार केली असून, आता प्रशासन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

ग्रामसभा घेण्यापूर्वी नियमानुसार गावात नोटीस लावणे, दवंडी देणे आणि नागरिकांना सभेची माहिती देणे अपेक्षित असताना, ही प्रक्रिया पार पाडली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही नागरिकांना माहिती न देता ग्रामसभा घेतल्याचे आरोप करण्यात आले असून, त्या ग्रामसभा नियमानुसार झाल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्कारामुळे ग्रामसभा वारंवार रद्द होत असल्याने गावातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांना विश्वासात घेऊन नियमानुसार ग्रामसभा तातडीने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामसभाच वेळेवर होत नसल्याने गावाचे प्रश्न मांडायचे कुठे? असा सवाल उपस्थित करत, लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा इशाराही शिवरा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

आता या तक्रारीची प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.