Header Ads

वेदगंगेच्या तीरावर भक्तिसंगीताची सुरेल बरसात! शेणगावात श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

 वेदगंगेच्या तीरावर भक्तिसंगीताची सुरेल बरसात! शेणगावात श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

वसुबारस व गुरुद्वादशीचे औचित्य साधत श्री एकमुखी दत्त मंदिरात दोन तास रंगली मराठी भावभक्ती गीतांची मैफल; अजरामर भक्तिगीतांनी परिसर झाला भक्तिमय!


शेणगाव | प्रतिनिधी

दिवाळीचा मंगलमय उत्साह, वेदगंगा नदीचा निसर्गरम्य तीर आणि कानावर पडणारे सुरेल भक्तिस्वर... अशा भक्तिमय वातावरणात शेणगाव (ता. भुदरगड) येथील श्री एकमुखी दत्त मंदिर परिसरात श्री ब्रह्मचैतन्य ग्रुप, कोल्हापूर यांच्या मराठी भावभक्ती गीतांच्या संगीत मैफलीने रसिकांची मने जिंकली. वसुबारस व गुरुद्वादशीच्या औचित्याने आयोजित या मैफलीत अजरामर भक्तिगीतांची सुरेल मेजवानी अनुभवताना उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

वेदगंगा नदीकाठावरील श्री एकमुखी दत्त मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. श्री दत्तमूर्तीचा अभिषेक, पूजा, आरती तसेच पालखी पूजन आदी पारंपरिक धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडले. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने सायंकाळी संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले.

श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या दीपाली पोरे यांनी 'तुझ्या कांतीसम' या गणेशवंदनेने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर अभय नेर्लेकर यांनी सादर केलेल्या 'ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था' या गीताने वातावरणात भक्तिरसाची अनुभूती निर्माण केली. चंद्रशेखर फडणीस, आदित्य मैंदर्गीकर, दीपाली पोरे आणि अभय नेर्लेकर यांनी 'मज भेटून जावो', 'शोधिशी मानवा', 'अविरत ओठी घ्यावे नाम', 'निघालो घेऊन' यांसारखी एकापेक्षा एक सरस भक्तिगीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.

विशेष म्हणजे अभय नेर्लेकर आणि चंद्रशेखर फडणीस यांनी सादर केलेल्या 'माझे माहेर पंढरी' या विठ्ठलभक्तीपर अभंगाने मैफलीत अक्षरशः रंगत आणली. टाळ्यांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात दोन तास चाललेली ही मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. अश्विनी टेंबे यांनी आपल्या माहितीपूर्ण आणि प्रभावी निवेदनातून संपूर्ण कार्यक्रमाला सुंदर सादरीकरणाची जोड दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी राजू शिंदे, शार्दूल टेंबे, विजय भोसले, सविता देसाई, रवींद्र पाठक, कुंभार सर, संजय पीसे, मनोज कुलकर्णी, विजय मुंगळे यांच्यासह मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच पंचक्रोशीतील आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.