Header Ads

मोर्शी नगरपरिषदेतील मांसाहारी पार्टी प्रकरण तापले; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आमदार यावलकर आक्रमक!

 मोर्शी नगरपरिषदेतील मांसाहारी पार्टी प्रकरण तापले; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आमदार यावलकर आक्रमक!

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निलंबनाची मागणी; सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी.


.पी. एन. देशमुख | जिल्हा प्रतिनिधी अमरावती (मोर्शी) :

मोर्शी नगरपरिषद कार्यालयातील मांसाहारी पार्टी प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणी आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. सोमवारी (१६ नोव्हेंबर) त्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात अधिकृत तक्रार सादर केली.

दीपावली मिलनाच्या नावाखाली दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालयात सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मटण आणि माशांची मेजवानी झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. सार्वजनिक कार्यालयाचा वापर अशा प्रकारे करणे नियमबाह्य असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे.

या पार्टीमध्ये मुख्याधिकारी पराग वानखडे, शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, काँग्रेस व सत्ताधारी गटाचे नगरसेवक तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा आमदार यावलकर यांनी केला. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शासकीय कार्यालयात अशा प्रकारच्या मांसाहारी पार्टीचे आयोजन करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, नगरपरिषद कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवावेत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सोमवारी खुलासा सादर करण्याची मुदत होती. मात्र, त्यांचा खुलासा टपालाद्वारे प्राप्त झाल्याची माहिती नगरपालिका प्रशासन विभागाने दिली आहे.

आता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे. विशेष चौकशी समिती नियुक्त करणे, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे आणि संबंधितांचे जबाब नोंदवणे असे पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे.

नगरपरिषद कार्यालयातील पार्टी प्रकरणाची चौकशी नेमकी कुणापर्यंत पोहोचणार आणि मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का, याकडे आता मोर्शीकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.