दोन मुली झाल्याचा राग अन् पत्नीला विहिरीत ढकलून संपवले! अपघाताचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेप
दोन मुली झाल्याचा राग अन् पत्नीला विहिरीत ढकलून संपवले! अपघाताचा बनाव करणाऱ्या पतीला जन्मठेप
ईश्वरपूर पत्नी हत्या प्रकरणाचा निकाल; पुरावे आणि १० साक्षीदारांच्या साक्षीने आरोपी दोषी, न्यायालयाचा कठोर दणका!
सांगली | प्रतिनिधी
दोन मुली झाल्या, मुलगा झाला नाही, या विकृत मानसिकतेतून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अखेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ईश्वरपूर येथील या खळबळजनक हत्या प्रकरणात आरोपी कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. पत्नीला विहिरीत ढकलून तिचा जीव घेतल्यानंतर अपघाताचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
नेमके काय घडले होते?
आरोपी कौस्तुभ सरनोबत याला दोन मुली झाल्या होत्या. मुलगा झाला नाही, या कारणावरून त्याच्या मनात पत्नीविषयी राग होता. याच रागातून त्याने पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. त्यानंतर तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. मात्र, हा प्रकार अपघात असल्याचे भासवून पोलिसांत खोटी तक्रार नोंदवली. तपासादरम्यान हा बनाव उघडकीस आला.
१० साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या निर्णायक!
या प्रकरणी मिलिंद नानासो भोसले (वय २८, रा. रमण मळा, कोल्हापूर) यांच्या फिर्यादीवरून १८ सप्टेंबर २०२२ रोजी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२२ अन्वये भा.दं.वि. कलम ३०२, ४९८(अ) आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र प्रकरण क्रमांक १२७/२०२२ अन्वये सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात खटला चालला.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. विशाल नरेंद्र बावणे यांनी बाजू मांडली. एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादी मिलिंद भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. राऊत आणि तपासी अधिकारी शशिकांत चव्हाण यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
न्यायालयाचा कठोर निकाल; जन्मठेप आणि दंड!
सादर केलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच कलम ४९८(अ) अन्वये सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या प्रकरणाच्या कामकाजात पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस कर्मचारी उत्तम शिंदे आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मुलगा-मुलगी असा भेदभाव करून निष्पाप महिलेचा जीव घेणाऱ्या मानसिकतेला न्यायालयाच्या निकालाने कठोर संदेश दिला आहे. अपघाताचा बनाव करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न अखेर न्यायालयीन पुराव्यांसमोर टिकू शकला नाही.

No comments: