Header Ads

मुरगूडमध्ये पहिल्यांदाच भव्य कराओके गायन स्पर्धा उत्साहात २६ स्पर्धकांचा सहभाग; उत्कृष्ट गायनामुळे परीक्षकांकडून तीनऐवजी सहा क्रमांक जाहीर

 मुरगूडमध्ये पहिल्यांदाच भव्य कराओके गायन स्पर्धा उत्साहात २६ स्पर्धकांचा सहभाग; उत्कृष्ट गायनामुळे परीक्षकांकडून तीनऐवजी सहा क्रमांक जाहीर.

मुरगूड / जोतीराम कुंभार

    मुरगूडमध्ये पहिल्यांदाच ‘उभरते कलाकार सिंगिंग ग्रुप, मुरगूड’ यांच्या वतीने आयोजित भव्य कराओके गायन स्पर्धा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. या स्पर्धेत मुरगूड, कागल, तळाशी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, गडहिंग्लज आणि गारगोटी येथील एकूण २६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मराठी, हिंदी आणि शास्त्रीय गीतांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना संगीताची मेजवानी अनुभवायला मिळाली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवम म्युझिक क्लासेस, कोल्हापूरचे संचालक संजय कवठे आणि मुरगूडचे रणजित रावण यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून मुरगूडचे माजी नगरसेवक अमर सनगर आणि डॉ. सचिन भारमल उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट गायन सादर केल्याने विजेत्यांची निवड करताना परीक्षकांसमोर पेच निर्माण झाला. स्पर्धकांच्या गायनाचा दर्जा आणि त्यांच्यातील चुरस लक्षात घेऊन नेहमीच्या तीन क्रमांकांऐवजी सहा क्रमांक जाहीर करण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे प्रत्येकी दोन स्पर्धकांना विभागून देण्यात आली.

यामध्ये प्रथम क्रमांक नयन कामत व दयानंद स्वामी यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक स्वप्नाली सुतार व सचिन चौगले (गारगोटी) यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक युवराज वाळवेकर व सचिन कांबळे यांनी पटकावला.

या कार्यक्रमाचे नियोजन सर्जेराव साखळकर, सचिन महिंद, वैभव स्वामी, डॉ. संजय सुतार, निवृत्ती शेटके, दिलीप तांबे, समीर कटके, रणजित रावण, संदीप कांबळे, प्रदीप भोपळे, सुरेश भोई, संग्राम डवरी आणि गोविंद घुंगरे पाटील यांनी केले.

नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि संगीतप्रेमींना एकत्र आणणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पहिल्याच उपक्रमाला स्पर्धकांसह संगीतप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा सांगीतिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा रसिकांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.