महालक्ष्मी तलावातील अनधिकृत बांधकामावरून संतापाचा उद्रेक!
महालक्ष्मी तलावातील अनधिकृत बांधकामावरून संतापाचा उद्रेक!
आठ दिवसांत बांधकाम पाडा, अन्यथा पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकणार; अनिकेत कांबळे यांचा प्रशासनाला अंतिम इशारा...
राधानगरी | प्रतिनिधी. विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील फेजिवडे पैकी रामाचीवाडी येथील गट क्रमांक १७३ मधील महालक्ष्मी तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या इमारतीचा वाद आता चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. संबंधित बांधकामासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) अथवा भाडेकरार देण्यात आलेला नसल्याची माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी श्री. अनिकेत प्रकाश कांबळे यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी भोगावती पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदन देत प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत संबंधित बांधकामावर कायदेशीर कारवाई करून ते पाडण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
कारवाई न झाल्यास कार्यालयाला टाळे!
वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महालक्ष्मी तलाव परिसरातील या कथित अनधिकृत बांधकामावर पाटबंधारे विभाग आता कोणती भूमिका घेणार? प्रशासन कारवाई करणार की आंदोलनाचा भडका उडणार? याकडे फेजिवडे सह संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.


No comments: