लोखंडी गेट अभावी माजगाव आरोग्य उपकेंद्र असुरक्षित
लोखंडी गेट अभावी माजगाव आरोग्य उपकेंद्र असुरक्षित.
माधुरी मस्कर-पन्हाळा
पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला मुख्य लोखंडी प्रवेशद्वार नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेटअभावी आरोग्य केंद्र परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी व धूम्रपान करणाऱ्यांसाठी हे केंद्र अड्डा बनले आहे. तसेच, येथील गटारींची स्वच्छता न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत माजगावसह माळवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, देवठाणे आदी गावांतील सुमारे साडेसात हजार लोकसंख्येसाठी हे आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी महिला, आबालवृद्ध औषधोपचार, आरोग्य तपासणी व लसीकरणासाठी येतात. मात्र, उपकेंद्राचे लोखंडी गेट काही महिन्यांपूर्वी निखळून पडल्याने सुट्टीच्या दिवशी तसेच रात्रीच्या वेळी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्री काही जण आरोग्य केंद्राच्या पायऱ्यांवर बसून धूम्रपान करतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता होत असते. तसेच गेटअभावी उपकेंद्रातील रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचाही गैरवापर होत आहे.
इमारतीभोवतालच्या गटारींची दीर्घकाळ स्वच्छता न झाल्याने दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा त्रास रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. उपकेंद्राला लोखंडी गेट बसवावे, गटारींची नियमित स्वच्छता करावी तसेच धूम्रपान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट : -----
"उपकेंद्राच्या इमारतीचे निखळलेले लोखंडी गेट बसवावे, तसेच बाजूच्या गटारींची वेळोवेळी स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे."
— डॉ. आशिष मिसाळ, माजगाव आरोग्य उपकेंद्र
फोटो ओळ : माजगाव आरोग्य केंद्राला लोखंडी गेट नसल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

No comments: