आई अंबाबाई सीईओंना सुबुद्धि दे तिळवणीच्या गायकवाड कुटुंबीयांचे 7जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जि.परिषद दंडवत घालून साकडे.
आई अंबाबाई सीईओंना सुबुद्धि दे तिळवणीच्या गायकवाड कुटुंबीयांचे 7जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जि.परिषद दंडवत घालून साकडे.

------------------------------------------------------------
शशिकांत कुंभार
-----------------------------------------------------------
तिळवणीच्या गायकवाड कुटुंबीयांचे 7जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जि.परिषद दंडवत घालून साकडे
कोल्हापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला सुबुद्धी लाभू दे, त्यांना कर्तव्याची जाणीव होऊ दे म्हणून तिळवणी (ता.हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सहकुटुंब अंबाबाई मंदिर ते जि. परिषद दंडवत घालत साकडे घालणार आहेत. सोमवार दि.7 जुलैला सीईओंच्या काळ्या कर्तुत्वाचा फलक घेऊन आंदोलन करणार आहेत तसे त्यांनी सीईओंसहित, पुणे विभागीय आयुक्त व कोल्हापूर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनाही निवेदनाद्वारे कळवले आहे.
अनु.जातीचे असलेले सुनील गायकवाड यांचा 750 स्क्वे. फुटांचा प्लॉट सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आपल्या घरगड्याच्या नावावर केला आहे. या बेकायदेशीर कृत्यात भ्रष्ट ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी मदत केली आहे. त्या विरोधात सीईओंना अनेक वेळा समक्ष भेटून लेखी निवेदन देऊन भ्रष्ट ग्रामसेविका यांना बडतर्फ करावे, घरगड्याच्या नावावर बेकायदेशीर प्लॉट लावण्याचा ठराव करणारे भूखंड चोर सरपंच व ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवून त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी तसेच ठरावाला पाठिंबा देणारी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी केली होती परंतु सीईओंनी कोणतेही कारवाई/कार्यवाही केली नसून पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
एखाद्याचा प्लॉट दुसऱ्याच्या नावावर करण्याचा अधिकार ग्रामसेविकांना आहे का? उद्या तुमचा प्लॉट घेऊन ग्रामसेविकेने दुसऱ्याच्या नावावर केल्यावर तुम्ही जागे होणार आहात का? कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणारे हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावर आपण कारवाई का करत नाही? आपण दबावाला बळी पडत आहात की अमिषाला? गलेलठ्ठ वेतन, आलिशान निवास,मोबाईल, गाडी व सर्व आधुनिक सुविधा शासन आपल्याला का देत आहे? जनतेची कामे जलद होण्यासाठी का मागासवर्गीयांच्या भूखंडात हात साफ करण्यासाठी? ग्रामसेविकेला वाचवण्यासाठी एवढा जिवाचा आटापिटा कशासाठी? सरपंच व सदस्य तसेच तंटामुक्ती व ग्रामपंचायत बरखास्त झाले तर तुमचे कोणते नुकसान होणार आहे? त्यांच्याकडून घेतलेला नजराना/बिदागी परत द्यावी लागेल अशी भीती तर तुमच्या मनात नाही ना? दप्तर दिरंगाई, सेवाहमी कायदा कोल्हापूर जिल्ह्याला लागू नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून 'भूखंडात तुमचा वाटा किती?'असा फलक घेऊन आपल्या कार्यालयासमोर ३ वेळा उपोषणाला बसूनही भ्रष्टाचाराने बरबटलेले आपले तोंड न उघडून आपण निर्लज्जपणाची हद्द ओलांडल्याचे म्हटले आहे.
तीनही उपोषणावेळी आपल्या अपेक्षेप्रमाणे वेळ देऊनही प्लॉट अद्यापही नावावर झाला नाही.13 मे 2025 रोजी मी विभागीय आयुक्त पुणे येथे आपल्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "दहा दिवसांत प्लॉट नावावर करतो,उपोषण मागे घ्या"अशी विनंती केली, त्यामुळे मी उपोषण स्थगित केले. आज दीड महिना होत आला तरी माझे काम झाले नाही (तेव्हा आपण रजेवर होता; हजर असता तरी आपण मला सामोरे आला नसता, तेवढे नैतिक धैर्य आपल्यात नाही)
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक चांगल्या आय.ए.एस अधिकाऱ्यांची परंपरा आहे. राजगोपाल देवरा, शशिकांत देठणकर, लक्ष्मीकांत देशमुख अशा अनेक अधिकाऱ्यांची आजही येथे आठवण काढली जाते. अपेक्षेपेक्षा कमी वेळात लोकांची कामे करून येथे अनेक अधिकारी हिरो होऊन गेले आहेत पण या उज्वल परंपरेची आपण आपल्या निष्क्रिय कर्तुत्वाने माती केली. मागासवर्गीयांच्या भूखंडाचे श्रीखंड खाणारा, लोकांना भेटी दिवशीही तिष्ठत ठेवणारा, पत्रांना उत्तर न देणारा असा या जिल्ह्याचा सीईओ आपण पहिलेच ठरला आहात. भूखंड चोर सरपंचांना व भ्रष्टाचारी ग्रामसेविका यांना पाठीशी घालून आपण भावी वाल्मिकी कराड निर्माण करत आहात, कोल्हापूर जिल्ह्याचा बीड जिल्हा बनवू पहात आहात. संविधानाची मोडतोड करून, भ्रष्टाचारांना पाठीशी घालून,' हम करे सो कायदा ' बनवत आहात.आपले काम प्रामाणिकपणे न करणे हा द्रोह आहे. आपल्याला देशद्रोही का संबोधू नये? कोट्यावधी रुपयांची शासकीय मालकीच्या जमिनीची विक्री झाली असताना व ते मी आपल्या निदर्शनास आणून देऊनही आपण जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहात. या साऱ्या विरोधात मी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली आहेच, त्यांच्याकडचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
आपल्या या भ्रष्ट वागणुकी विरोधात सोमवार दि.7 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अंबाबाई मंदिर ते जिल्हा परिषद सहकुटुंब शांततेच्या मार्गाने आपल्या काळ्या कर्तुत्वाचा फलक घेऊन दंडवत घालणार आहे. अंबाबाईने आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीस लगाम घालून आपल्याला कर्तव्याची जाणीव करून द्यावी आपले अधिकार वापरण्याची व एका मागासवर्गीय युवकाला त्यांचा प्लॉट परत मिळवून देण्याची सुबुद्धी द्यावी असे साकडे घालणार आहे. यावेळी आपल्याला भेटून आपल्याकडून माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचणार आहे, आपण कार्यालयात उपस्थित रहाल अशी अपेक्षाही शेवटी निवेदनात व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment