कोल्हापूर पोलिसांनी रात्रीची घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद ; 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.

 कोल्हापूर पोलिसांनी रात्रीची घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद ; 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.

******************

शशिकांत कुंभार 

******************

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत रात्रीच्या घरफोडी चोऱ्या करणारी एक मोठी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील एकूण 15 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, 137 ग्रॅम सोने, 1,286 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्यासह एकूण 20 लाख 96 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकासह शाहूवाडी विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार केले.

या पथकाने ग्रामीण भागातील रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या ठिकाणी भेटी देऊन, गुन्हे करण्याची पद्धत आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती गोळा केली. या तपासात, अज्ञात चोरटे चारचाकी वाहनातून येऊन बंद घरे लक्ष्य करत असल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण जिल्ह्यातील रात्रीच्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा एकत्रित तपास सुरू करण्यात आला.

तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार समीर मुल्ला यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शाहूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सुभाष काळे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे आणि तो सांगली फाटा येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने 16 जुलै 2025 रोजी सांगली फाटा येथील महाडीक पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून आरोपी काळे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख 71 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार, शाहूवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. आरोपी सुभाष शंकर काळे याला अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली. त्याच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेत असताना, त्याचा साथीदार सागर चंदू साळुंखे (वय 30, रा. उमराणी रोड जत, ता. जत, जि. सांगली) याला सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी दुसऱ्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे समजले. त्याचा ताबा घेऊन त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

या दोन्ही आरोपींकडे एकत्रित तपासणी केली असता, ते आणि त्यांचे इतर साथीदार झायलो गाडीतून कोल्हापूर जिल्ह्यात येऊन ग्रामीण भागातील बंद घरे रात्रीच्या वेळी लक्ष्य करून घरफोडी करत होते आणि गुन्हे केल्यानंतर चोरीचे दागिने वाटून घेत होते. अटक केलेल्या आरोपी सुभाष शंकर काळे आणि सागर चंदू साळुंखे यांच्याकडून 137 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,286 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली झायलो चारचाकी गाडी असा एकूण 20 लाख 96 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फरार साथीदार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

या यशस्वी कारवाईमुळे अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार समीर मुल्ला, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रवींद्र कांबळे, संजय जानकर, अमोल तेली, हिंदुराव केसरे, अमोल कोळेकर, संजय पडवळ, अरविंद पाटील, नवनाथ कदम, अमित सर्जे, सतीश सूर्यवंशी, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, हंबीरराव अतिग्रे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील राजेंद्र ताटे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.