ग्रामस्थांनी सतर्क राहावे; वनविभागाचे आवाहन.
ग्रामस्थांनी सतर्क राहावे; वनविभागाचे आवाहन.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
वनपरिमंडळातील पाटपन्हाळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पडला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अर्धवट खाल्लेल्या शेळ्यांचे अवशेष आणि बिबट्या मादी व तिच्या एका बछड्याचे पायसर आढळले आहेत.सध्या राधानगरी, फेजिवडे, बनाचीवाडी, पाटपन्हाळा, भांडणे आणि रामणवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून, ही गावे अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळे बिबटे गावांमध्ये येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने ग्रामस्थांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना रात्री घराबाहेर जाताना टॉर्च, मोबाईलचा टॉर्च किंवा घुंगरांची काठी सोबत ठेवावी.शक्य असल्यास रेडिओवर गाणी लावावीत, जेणेकरून बिबट्याला मनुष्याच्या उपस्थितीची जाणीव होईल.उन्हाळ्यात अंगणात झोपणे टाळावे, शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी/तारेचे कुंपण घालावे.उघड्यावर शौचास जाणे टाळावे, बंदिस्त शौचालयाचा वापर करावा.लहान मुले व पाळीव प्राणी यांना एकटे बाहेर सोडू नये.ऊसशेती करताना घर व ऊसाच्या फडामध्ये किमान २०–२५ फूट अंतर ठेवावेवन्यप्राण्यांची हालचाल नैसर्गिक असली, तरी आपली आणि पशुधनाची सुरक्षितता राखणे आवश्यक आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ संबंधित वनविभाग किंवा ग्रामपंचायतीस माहिती द्यावी. सरपंच व वनविभागाच्यावतीने हे आवाहन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी जागरूक राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment