प्रेमविवाहाच्या रागातून युवकावर तलवारीने गंभीर हल्ला दोघे फरारी आरोपी पोलिसांनीच्या ताब्यात.
प्रेमविवाहाच्या रागातून युवकावर तलवारीने गंभीर हल्ला दोघे फरारी आरोपी पोलिसांनीच्या ताब्यात.
-----------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
इचलकरंजी (ता. हातकणंगले) येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाहाच्या रागातून एक धक्कादायक हल्ल्याची घटना घडली असून, याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या युवकाच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना २० जुलै २०२५ रोजी आभार फाटा, कबनूर येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी वैभव अनिल पुजारी (वय २३, रा. चंदूर) यांनी त्यांच्या पत्नी हिच्याशी प्रेमविवाह केल्यामुळे आरोपींनी वैमनस्यातून तलवारीने गंभीर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी पाठलाग करत वैभव पुजारी यांच्यावर डोक्यावर, हातावर आणि पाठीत तलवारीने वार केले. सदर हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेत मयूर आकाराम पुजारी, ओंकार बिरू पुजारी, शुभम बोरसे, राहुल कांबळे आणि बंडा शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात मोक्का कायद्यानुसारही कलमे लावण्यात आली असून, पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
दरम्यान, २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी ओंकार बिरू पुजारी (रा. तिळवणी) आणि राहुल श्रीकांत कांबळे (रा. इचलकरंजी) हे कर्नाटकात पलायन करण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तावडे हॉटेल परिसरातून त्यांना अटक केली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार राबवलेल्या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
सदर मोहिम पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस कर्मचारी वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बरगे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, सागर चौगले, महेश पाटील, अरविंद पाटील आदींनी सहभाग घेतला.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, तपास शिवाजीनगर पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्वाची ठरली आहे.
Comments
Post a Comment