राजापुरातील पाचल उपसरपंचाची मुजोरगिरी! ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात."शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप,पोलिसात तक्रार"
राजापुरातील पाचल उपसरपंचाची मुजोरगिरी! ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात."शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप,पोलिसात तक्रार"
----------------------------------
रत्नागिरी प्रतिनिधी
तुषार पाचलकर
----------------------------------
रत्नागिरी जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त पाचल ग्रामपंचायतीमध्ये काल (१४ जुलै) सकाळी गंभीर प्रकार घडला. उपसरपंच आत्माराम सुतार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी सुभाष काळे यांना कानशिलात लगावली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सुभाष काळे यांनी पाचल ग्रामपंचायत व राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सुभाष काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी सकाळी ते कार्यालयात हजर असताना स्ट्रीट लाईट संदर्भात उपसरपंचांशी चर्चा सुरू होती. या वेळी
शिव्या का दिल्या ही विचारणा केली असता उपसरपंच आत्माराम सुतार यांनी अचानक त्यांना कानाखाली लगावली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावेळी कार्यालयात इतर कर्मचारीही उपस्थित होते.
तक्रारीमध्ये असेही नमूद आहे की, १२ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कामासंदर्भात फोनवर बोलत असताना सुतार यांनी त्यांना आईवरून अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ केली. यासंबंधी जाब विचारल्यावर कार्यालयातच मारहाण करण्यात आल्याचा आरोप सुभाष काळे यांनी केला आहे.
सुभाष काळे यांनी आरोप केला आहे की, उपसरपंच सुतार यांच्याकडून वारंवार शिवीगाळ व जातीवाचक अपमान केला जातो. "तुमची धनगराची लायकी काय आहे? दीड दमडीचा तू, तुझ्यासारखे पन्नास नोकर माझ्याकडे आहेत," असे वक्तव्य सुतार वारंवार करतात, असा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. यापूर्वी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं, मात्र प्रत्यक्ष मारहाण झाल्यामुळे तक्रार नोंदवावी लागल्याचं त्यांनी सांगितलं.
या अगोदरही उपसरपंच आत्माराम सुतार यांनी सदस्य असताना पाचल ग्रामपंचायतीच्या एका बैठकीदरम्यान आपल्या सहकाऱ्यावर खुर्ची उगारल्याचा प्रकार घडल्याचेही समजते.
या प्रकरणाबाबत उपसरपंच आत्माराम सुतार यांचा अधिकृत प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
Comments
Post a Comment