राज्य सरकारचे 50 हजाराचे अनुदान खरोखरच गोर गरिबांच्या घराचा स्वप्रसिद्धीचा मार्ग मोकळा होणार का?
राज्य सरकारचे 50 हजाराचे अनुदान खरोखरच गोर गरिबांच्या घराचा स्वप्रसिद्धीचा मार्ग मोकळा होणार का?
-------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------
फडणवीसांची मोठी घोषणा पण अंमलबजावणी कितपत गतीने होणार.
राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० लाख घरांना आता मोफत वीज मिळणार आहे. या प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.
सोलापूरमधील दहिणटे आणि शेळगी येथे बांधलेल्या सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांना दर्जेदार घरे मिळावीत, त्यांना वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मोफत मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सर्व घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येईल आणि त्यामुळे या कुटुंबांना वीजबिलाचा भार सहन करावा लागणार नाही.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “सोलापूरने गृहनिर्माण क्षेत्रात एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. गरीब आणि निम्नमध्यमवर्गीयांसाठी दर्जेदार कॉलनी कशा उभारता येतात याचे उत्तम उदाहरण सोलापूरने दाखवले आहे. राज्यात कोणतेही कुटुंब बेघर राहू नये, यासाठी आणखी गृहनिर्माण प्रकल्प राबवले जातील.”
सोलापूरमध्ये उभारणार आयटी पार्क
या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, “पुण्यातील आयटी पार्कमध्ये तुम्ही आवाज दिलात तरी अर्धे कर्मचारी सोलापूरचेच असतात. मग आयटी पार्क सोलापुरात का नसावे? आता पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी योग्य जागा शोधून काढावी. एमआयडीसीच्या माध्यमातून पुण्यासारखे आधुनिक आयटी पार्क मी सोलापुरात उभारून देईन.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आयटी क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधींमुळे सोलापूरकरांना आपल्या जिल्ह्यातच नोकऱ्या मिळतील. उद्योग-व्यवसायाचे वातावरण निर्माण करून सोलापूरला नव्या विकासाची गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान आवास योजनेचे महत्त्व
राज्यात ३० लाख घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारली जात आहेत.
प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात येणार.
लाभार्थींना मोफत वीज मिळणार.
राज्य सरकारकडून ५० हजारांचे अनुदान.
बेघरमुक्त महाराष्ट्र हा सरकारचा ध्येय.
👉 मुख्यमंत्रींच्या या घोषणेमुळे राज्यातील गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळणार असून, स्वस्त आणि दर्जेदार घरासोबत मोफत वीज मिळणे हा मोठा टप्पा मानला जात आहे.
Comments
Post a Comment