बँक ऑफ बडोदामधील प्रिंटिंग मशीन बंद पडत असल्याने ग्राहक त्रस्त.
बँक ऑफ बडोदामधील प्रिंटिंग मशीन बंद पडत असल्याने ग्राहक त्रस्त.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
------------------------------
कोल्हापूर / कागल: कोल्हापूर जिल्ह्यासह कागल येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बंद असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्या आणि वारंवार खराब होणाऱ्या मशीनमुळे पासबुक प्रिंट न होण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे बँकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
वारंवार तक्रारी, तरीही दखल नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक या समस्येबद्दल बँकेकडे वारंवार तक्रारी करत आहेत, मात्र यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. पासबुक अपडेट होत नसल्यामुळे अनेक ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांची माहिती मिळत नाही. परिणामी, त्यांना बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
अधिकारी म्हणतात, ‘वरिष्ठांकडे मागणी केली आहे’
या समस्येबाबत बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "नवीन पासबुक प्रिंटिंग मशीनची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. लवकरच ही समस्या दूर होईल अशी आशा आहे." परंतु, कोल्हापूर जिल्ह्यात प्रिंटिंग मशीन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ मर्यादित असल्याने दुरुस्ती वेळेवर होत नाही, ज्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
या सर्व प्रकारामुळे बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन नवीन मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून जोर धरत आहे.
Comments
Post a Comment