कोल्हापुरात दोन गटात हाणामारी, मोठ्या प्रमाणात दगडफेक मोडतोड.
कोल्हापुरात दोन गटात हाणामारी, मोठ्या प्रमाणात दगडफेक मोडतोड.
कोल्हापूर, 23 ऑगस्ट 2025: कोल्हापूर शहरातील राजेबागस्वार दर्गा आणि सिद्धार्थनगर परिसरात झालेल्या वादांमुळे निर्माण झालेला तणाव शांत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. भारत तरुण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईच्या लोखंडी संरचनेमुळे दोन्ही गटांमध्ये वाद झाला, ज्यामुळे दगडफेक आणि तोडफोड झाली.
या घटनेत स्थानिक नागरिकांसह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली, त्यापैकी एक गाडी पेटवून दिली, यात अंदाजे ₹1,00,000/- चे नुकसान झाले. याप्रकरणी राजेबागस्वार भारत तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सिद्धार्थनगर येथील नागरिक आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर तातडीने, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी दोन्ही गटांशी संवाद साधला. त्यांनी सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरात नागरिकांची आणि राजेबागस्वार दर्गा येथे भारत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या उपस्थितीत दोन्ही समाजातील प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत, हा वाद दोन समाजांमधील नसून दोन मंडळांमधील असल्याचे मान्य करण्यात आले. यापुढे सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याचा निर्धार करण्यात आला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सर्वानुमते करण्यात आली, ज्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीत 60 ते 70 लोकप्रतिनिधी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सार्वजनिक सुव्यवस्था, सलोखा आणि एकोपा राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, जातीय भावना दुखावणाऱ्या किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित न करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या बैठकीला पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, प्रविण खानापूरे, श्रीराम कन्हेरकर आणि सुशांत चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment