११०० झोपडपट्टीधारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर – आमदार यड्रावकर यांची ग्वाही.
११०० झोपडपट्टीधारकांना येत्या वर्षभरात हक्काचे घर – आमदार यड्रावकर यांची ग्वाही.
-------------------------------
नामदेव भोसले
-------------------------------
गेल्या पन्नास वर्षांपासून हक्काच्या घरासाठी झगडणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना अखेर आकार मिळत आहे. जयसिंगपूरातील राजीव गांधी नगर भागातील ६४ झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट ग्वाही दिली की, “येत्या वर्षभरात उर्वरित ११०० झोपडपट्टीधारकांनाही हक्काचे घर मिळवून देणार आहे.”
समारंभात बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, झोपडपट्टीतील मुले आज उच्च शिक्षण घेत आहेत. रोजगार आणि व्यवसायासाठी तरुणांना मदत केली जाणार आहे. ज्यांची घरे जिर्ण झाली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. कुणीही नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्याधिकारी टीना गवळी यांनी प्रास्ताविकात नगरपालिकेच्या वतीने सर्व झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. तर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले की, “आजचा दिवस जयसिंगपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आहे. केवळ आश्वासने न देता खऱ्या अर्थाने नागरिकांना कायदेशीर हक्क मिळत आहे.”
पहिल्या टप्प्यात ६४ लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले असून, प्रत्येकाच्या नावावर २५ ते ३० लाखांच्या मूल्याची मालमत्ता नोंदवली गेली आहे. उर्वरित घरांनाही लवकरच प्रॉपर्टी कार्ड वाटप होणार आहे.
कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. झोपडपट्टीवासीयांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment