किणी येथे एका युवतीची आत्महत्या.
किणी येथे एका युवतीची आत्महत्या.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
सलीम शेख
---------------------------------------
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील किणी येथील १७ वर्षीय महाविद्यालयीन युवतीने एका अल्पवयीन मुलाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयेशा जमीर महाबरी असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे. पोलीस बनून कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आयेशाने बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. ही आत्महत्या नसून खूनच आहे, असा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पोलीस होण्याचं होतं स्वप्न
किणी गावात राहणारे जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक आहेत, तर त्यांची पत्नी मजुरीचे काम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांची १७ वर्षांची मुलगी आयेशा शिक्षण घेत होती. ती पोलीस भरती होऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं स्वप्न पाहत होती. रोज महाविद्यालयात ये-जा करताना गावातीलच एक अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करून त्रास देत होता. तीन महिन्यांपूर्वी ही गोष्ट तिने आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. त्यानंतर वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांना ताकीदही दिली होती.
बुधवारी महाविद्यालयातून परत येत असताना, संबंधित अल्पवयीन मुलगा एसटीमध्ये तिच्याजवळ बसला आणि "तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही. तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाही," अशी धमकी दिली. ही गोष्ट आयेशाने दुपारीच फोनवरून आपल्या आईला सांगितली होती. घाबरलेल्या आयेशाला तिच्या आईने धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी परत आल्यावर आयेशाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं.ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. जमावाने संबंधित अल्पवयीन मुलाच्या घरावर मोर्चा नेला. त्याला पकडून गावात आणून चोप दिला. याची माहिती वडगाव पोलिसांना देण्यात आली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर, काही सुजाण नागरिकांनी हस्तक्षेप करून मुलाला जमावाच्या तावडीतून वाचवले आणि ११२ नंबरवर फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली
या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (१४ ऑगस्ट) रात्री किणी गावातून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी आयेशाला श्रद्धांजली अर्पण केली आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी उपसरपंच अशोक माळी, एड. एन. आर. पाटील, नंदकुमार माने, रेशमा मुजावर, अण्णा मगदूम, धीरज चव्हाण, प्रदीप धनवडे आणि विजयसिंह चव्हाण यांनी केली.
Comments
Post a Comment