नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे कचरा उठाव विस्कळीत – स्वच्छता अभियानाची जयसिंगपूरात वाट लागली.
नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे कचरा उठाव विस्कळीत – स्वच्छता अभियानाची जयसिंगपूरात वाट लागली.
-----------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
-----------------------------
शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून कचरा उठावासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली असली तरी गेल्या काही दिवसांपासून या सेवेत प्रचंड अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे अनेक भागांत कचरा साचून नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपरिषद आणि घंटागाडी चालकांविरोधात रोष उसळला आहे.
नगरपरिषदेकडून खासगी कंपनीमार्फत कचरा उठावाचे टेंडर देण्यात आले होते. सुरुवातीला ही सेवा सुरळीत सुरू होती; मात्र मागील दोन महिन्यांपासून गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. परिणामी अनेक वार्डांत दररोज कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता पसरत आहे.
झोपडपट्टी भागातील नागरिकांना थेट तक्रार नोंदवणे कठीण जात असल्याने त्यांचा राग घंटागाडी चालकांवर निघतो. कोणत्या वार्डात गाडी पोहोचली नाही याची माहिती संबंधित खात्याला असतानाही, तक्रार आल्यानंतरच नगरपरिषद कारवाई करते, असा नागरिकांचा आरोप आहे. अनेकदा इतर वार्डातील गाडी वळवून तात्पुरता उपाय केला जातो; मात्र त्यामुळे नियमिततेचा प्रश्न सुटलेला नाही.
शासनाच्या “स्वच्छ शहर – सुंदर शहर” आणि “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” या मोहिमांची जयसिंगपूरात प्रत्यक्षात वाट लागली असून, नगरपरिषदेकडून ठोस, शिस्तबद्ध आणि नियमित व्यवस्था राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Comments
Post a Comment