कोल्हापुरात सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन: न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात.
कोल्हापुरात सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन: न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
कोल्हापूर : न्यायाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत कोल्हापुरात सर्किट बेंचचे दिमाखदार उद्घाटन पार पडले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात त्यांनी रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित न्यायव्यवस्था कोल्हापुरात न्यायदानाचे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
या सर्किट बेंचसाठी गेल्या चार दशकांपासून विविध सामाजिक संघटना, वकील संघटना, पक्षकार आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने लढा दिला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि कोल्हापूर न्यायाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले.
उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याचा अभिमान अनेकांनी व्यक्त केला.
या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी प्रवास न करता स्थानिक स्तरावरच न्याय मिळवता येणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून न्यायप्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
ही घटना केवळ न्यायव्यवस्थेचा विस्तार नाही, तर सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
Comments
Post a Comment