कोल्हापूर जिल्ह्यातील "बी. के. गँग" टोळीतील १३ जणांना एक वर्षासाठी हद्दपार.
कोल्हापूर जिल्ह्यातील "बी. के. गँग" टोळीतील १३ जणांना एक वर्षासाठी हद्दपार.
इचलकरंजी आणि हातकणंगले तालुक्यात 'बी. के. गँग' ही टोळी अनेक अवैध आणि धोकादायक गुन्हे करत होती, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या टोळीचा प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे (वय-४२) आणि त्याचे १२ साथीदार यामध्ये सहभागी होते. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सार्वजनिक शांतता आणि नागरिकांच्या मालमत्तेला धोका निर्माण झाला होता.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इचलकरंजी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ नुसार टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर, चौकशी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वेळोवेळी सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार टोळी प्रमुखाला आणि त्याच्या सदस्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली गेली. परंतु, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे समाजात दहशत निर्माण झाल्याचे सिद्ध झाले.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी या १३ जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले. इचलकरंजी पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करत त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवले आहे.
जर हद्दपार केलेले हे आरोपी कोणालाही कोल्हापूर जिल्ह्यात दिसले, तर नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment