इस्लामपूरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा आंदोलन – तिघा तरुणानी डोके आपटत रक्त काढूत प्रशासनाचा निषेध.
इस्लामपूरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा आंदोलन – तिघा तरुणानी डोके आपटत रक्त काढूत प्रशासनाचा निषेध.
----------------------------------
इस्लामपूरात प्रतिनिधी
किशोर जासूद
----------------------------------
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी इस्लामपूर शहरात बुधवारी टक्कर मोर्चा आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात तीव्र संताप व्यक्त करत तिघा तरुणांनी आपले डोके फोडून रक्त सांडले व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध केला.
“आम्ही आमचे रक्त सांडले, आता पुतळा उभा राहिला नाही तर फास लावून घेऊ,” असा थेट इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
शहरात गेली ३०-४० वर्षे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. १ ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव समितीने तहसीलदार कचेरी चौकात अर्धपुतळा बसविला होता. या अर्धपुतळ्याच्याच ठिकाणी कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
तात्पुरता अर्धपुतळा हटवला जाऊ नये म्हणून २४ तास पहारा
प्रशासनाने हा तात्पुरता पुतळा हटवू नये, यासाठी कार्यकर्ते २४ तास जागरण करून पहारा देत आहेत. मंगळवारी याच मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध नोंदवला होता.
मोर्चाची निघाली वाळवा पंचायत समिती परिसरातून सुरुवात
बुधवारी आंदोलनाची सुरुवात वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून टक्कर मोर्चा निघून तहसीलदार कचेरी चौकात पोहोचला. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आले.
रक्तबंबाळ निषेधाने वातावरण तणावपूर्ण
पोलीसांनी मोर्चेकऱ्यांना थांबवले असतानाच, अचानक तिघा तरुणांनी शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील रस्त्यावर आपले डोके भिंतीवर आपटत निषेध व्यक्त केला. काही क्षणात हे तरुण रक्तबंबाळ झाले. पोलिसांनी त्वरित त्यांना इस्लामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
महत्त्वाची मागणी
अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कायमस्वरूपी बसवावा.
साठे स्मारकासाठी निश्चित जागेवर प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
लोकप्रतिनिधींनी या मागणीचा सकारात्मक पाठपुरावा करावा.
Comments
Post a Comment