गांधीनगर पोलिसांच्या ढिसाळ कारभाराने तावडे हॉटेल परिसरात वाहतूक कोंडी.
गांधीनगर पोलिसांच्या ढिसाळ कारभाराने तावडे हॉटेल परिसरात वाहतूक कोंडी.
--------------------------------
गांधीनगर प्रतिनिधी
--------------------------------
शहराला खंडपीठाचा दर्जा मिळाल्यानंतर वाढलेल्या न्यायालयीन कामांमुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे. यातच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तावडे हॉटेल परिसरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, स्थानिक पोलीस निरीक्षक यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी किमान दोन वाहतूक हवालदारांची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ एकाच हवालदारावर सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, वेळेत कार्यालयात पोहोचणे, शाळेत जाणे किंवा रुग्णालयात पोहोचणेही कठीण झाले आहे.
रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांचे बेशिस्त पार्किंग वाहतूक कोंडीत आणखी भर टाकत आहे. नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिस निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वाहतूक शाखेकडूनही गांधीनगर आणि उचगाव ब्रिज परिसरासाठी फक्त तीनच पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
या समस्येवर काय उपाय करणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, संबंधित पोलीस निरीक्षकांनी “मी प्रयत्न करतो” असे थातूरमातूर उत्तर दिले. तसेच, त्यांनी दैनिक सुपर भारतच्या संपादकांना रस्त्यावर येऊन वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्याचे सूचक आव्हानही दिले.
या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुले, रुग्ण आणि नोकरदार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यापुर्वी गांधीनगर पोलीस ठाण्यात लाभलेले सुशांत चव्हाण,सत्यराज घुले, अर्जुन घोडे पाटील, जाधव यांच्या कार्यकाळामध्ये वाहतूक सुरळीत होत होती परंतु आत्ता पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या कार्यकिर्द मध्ये वाहतूक सुरळीत होताना दिसत नाही.
Comments
Post a Comment