रस्ते विकासात भ्रष्टाचाराचा आरोप — शिवसेनेचा महापालिकेवर हल्लाबोल.
रस्ते विकासात भ्रष्टाचाराचा आरोप — शिवसेनेचा महापालिकेवर हल्लाबोल.
----------------------------
सलीम शेख
----------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शिवसेनेने तीव्र शब्दांत टीका केली आहे. उपनेते संजय पवार आणि सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी संपादकांना दिलेल्या निवेदनात रस्ते विकास प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा आरोप करत ठेकेदारांच्या लाड थांबवण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, सलग तीन वर्ष गणेशोत्सवाच्या काळात गणरायाचे आगमन आणि विसर्जन खड्ड्यांतूनच होत आहे. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्यातील मिलीभगत जनतेच्या पैशावर दरोडा टाकत आहे.महापालिकेने 100 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात केवळ 23 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. दोषदायित्व कालावधीमध्ये रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांनी दुरुस्ती करणे अपेक्षित असताना, महापालिका स्वतःच कोट्यवधी रुपये खर्च करून पॅचवर्क करत आहे. यामुळे ठेकेदारांची जबाबदारी झटकून प्रशासन जनतेच्या पैशाचा अपहार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेने महापालिकेकडे दोषदायित्व कालावधीतील रस्त्यांची माहिती मागितली असून, ती अद्याप मिळालेली नाही. गणेशोत्सवात कोल्हापुरात होणारी गर्दी, पर्यटकांची ये-जा आणि नागरिकांचे हाल पाहता प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर महापालिकेने ठेकेदारांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्यास भाग पाडले नाही, तर होणाऱ्या जनआक्रोशास प्रशासन आणि शासन जबाबदार राहील.
Comments
Post a Comment