पूर्ववैमनस्यातून गांधीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी विठ्ठल पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू.
पूर्ववैमनस्यातून गांधीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी विठ्ठल पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू.
---------------------------------
गांधीनगर, प्रतिनिधी
---------------------------------
: गांधीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टीत गणेशोत्सवाचा मंडप उभारताना पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विठ्ठल कृष्णा पवार (वय 65) यांचा उपचारादरम्यान सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश ज्ञानू पवार आणि संशयित आरोपी गणेश उर्फ प्रथमेश कांबळे, अनिकेत कांबळे, राजू कांबळे, बजरंग कांबळे आणि सचिन कांबळे हे सर्व एकाच गल्लीत राहतात. निलेश पवार यांच्या प्रेमविवाहामुळे त्यांच्यात आणि आरोपींमध्ये जुना वाद सुरू होता. दोघेही गल्लीतील वेगवेगळ्या गणेश मंडळांमध्ये कार्यरत आहेत. रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री गणेश मंडळाचा मंडप घालत असताना गणेश उर्फ प्रथमेश कांबळे याने निलेश पवार यांचे चुलतभाऊ ऋषिकेश आणि चुलते विठ्ठल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ऋषिकेशच्या पाठीवर लाकडी ओंडक्याने वार करण्यात आला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निलेशला राजू आणि बजरंग यांनी मारहाण केली. त्याचवेळी सचिन कांबळे याने विठ्ठल पवार यांच्या गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. निलेश यांची आई अलका पवार भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, त्यांनाही दुखापत झाली होती.
स्थानिक लोकांनी तात्काळ विठ्ठल पवार यांना उपचारासाठी वसाहत रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. विठ्ठल पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांना अटक केली. यात सचिन आनंदा कांबळे, गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे, अनिकेत शिवाजी कांबळे, राजू रावसाहेब कांबळे आणि बजरंग रावसाहेब कांबळे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्ही मंडळांचे मंडपही काढण्यास भाग पाडले.
उपचारादरम्यान विठ्ठल पवार यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर आज, शुक्रवारी दुपारी 12 वाजता त्यांचा मृत्यू झाला. विठ्ठल पवार यांच्या निधनाने इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विठ्ठल पवार हे गांधीनगर येथील लोकनियुक्त सरपंचपदाचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार होते. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Comments
Post a Comment