मुंबई -पुण्यासह सहा जिल्ह्यात रेड अलर्ट- राज्यात पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होणार का ?

 मुंबई -पुण्यासह सहा जिल्ह्यात रेड अलर्ट- राज्यात  पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होणार का ?

--------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------------

राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. तीन दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने सोमवारीही जोर कायम ठेवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील तीन ते चार तासांत ‘अति मुसळधार पावसाचा’ अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


वाहतूक ठप्प, रस्त्यावर पाणीच पाणी

रविवार आणि सोमवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, मिलन सबवे, धारावी, भांडुप आदी भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून लोकल ट्रेन सेवा उशिराने धावत आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.


रविवारी पावसाचा आकडा

रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मुंबईत सरासरी २३.८१ मिमी पाऊस नोंदवला गेला. पूर्व उपनगरात २५.०१ मिमी, तर पश्चिम उपनगरात १८.४७ मिमी पाऊस झाला. काही ठिकाणी ४० ते ४५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. दिवसभर हलक्या-सुरुवातीच्या सरींनंतर मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने जोर धरला. सोमवारी सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा संततधार कोसळू लागली.


महापालिकेचा सतर्कतेचा इशारा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच राहणार असून रात्री वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा,” असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलं आहे.


मुंबई पोलिसांचा इशारा

मुंबई पोलीस आयुक्तांनीही नागरिकांना सूचना करताना म्हटलं आहे की, “अनेक भागांत पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत, दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. कृपया अनावश्यक प्रवास टाळा, अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा आणि प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करा.”


राज्यातील इतर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट

मुंबईसोबतच रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मुसळधार पावसाचे संकट गडद झाले आहे. नद्यांचे पाणी वाढू लागल्याने ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.


नागरिकांसाठी आवाहन

अनावश्यक प्रवास टाळावा


पाणी साचलेल्या रस्त्यांवर वाहनं नेण्याचे टाळावे


वीज पडणे, झाडं कोसळणे, भिंती कोसळण्याच्या घटनांपासून सावध राहावे


अधिकृत सरकारी आणि हवामान खात्याच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा


मुंबईतील मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहराची तग धरण्याची क्षमता कसोटीला लावली आहे. पुढील काही तास शहरासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.