सातवेसह परिसरात गणरायाचे जल्लोषात स्वागत.
सातवेसह परिसरात गणरायाचे जल्लोषात स्वागत.
-----------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
------------------------------------
बच्चे सावर्डे :गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सातवे (ता. पन्हाळा) येथे ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. सातवेसह बच्चे सावर्डे, आमतेवाडी, शिंदेवाडी, आरळे, बोरपाडळे, मोहरे आदी ठिकाणी गणेशभक्तांनी उत्साहात बाप्पांचे आगमन केले.
पंचक्रोशीत सर्वात मोठ्या असणाऱ्या सातवेच्या कुंभारवाड्यात सकाळपासूनच गणेशमूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमंडळांसाठी मूर्ती घेऊन जाण्यासाठी नागरिक पारंपरिक वेशभूषेत सज्ज झाले होते.
गावातील सार्वजनिक मंडळांसह पंचक्रोशीतील अनेक मंडळांनी सातवे कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घेतल्या. प्रमुख चौकांतून मिरवणुका जाताना “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
No comments: