पूर परिस्थिती नियंत्रणात ; नागरिकांनी सतर्क रहावे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पूरग्रस्त भागाची आमदार राजेंद्र पाटील यांनी केली पाहणी
पूर परिस्थिती नियंत्रणात ; नागरिकांनी सतर्क रहावे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पूरग्रस्त भागाची आमदार राजेंद्र पाटील यांनी केली पाहणी.
जयसिंगपूर कृष्णा–पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नृसिंहवाडी पूल, कुंभार गल्ली, गोठणपूर, शिकलगार वसाहत या पूरग्रस्त भागांची पाहणी करून श्री दत्त कॉलेज ठिकाणी स्थलांतर केलेल्या पूरग्रस्त नागरिकांना भेट दिली. दोन्ही राज्यांच्या समन्वयामुळे अलमट्टीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे, तसेच धरण क्षेत्रात देखील पाऊस कमी झाला असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. यड्रावकर म्हणाले, गेल्या वर्षी अकिवाट येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. आपली सुरक्षितता हाच सर्वोच्च प्राधान्य आहे. महापुराचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. दत्त महाविद्यालय व पार्वती सूतगिरणी येथे निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. जनावरांसाठी वैरण व राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. मी व्यक्तिगतरीत्या प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्त महाविद्यालय येथील निवारा केंद्रांना भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. काळजी करू नका, प्रशासन तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणीत तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, नगरपरिषदेच्या अधिकारी श्रद्धा वळवडे, प्राचार्य आर. जे. पाटील, तलाठी नितीन जाधव, माजी नगरसेवक उदय डांगे, दीपक गायकवाड, शरद आलासे, अक्षय आलासे, जवाहर पाटील, सुरेश बिंदगे, उमेश कर्णाळे, लक्ष्मण चौगुले, हिदयात मुजावर, फारूक जमादार यांच्यासह शहरातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment