राजाराम बंधाऱ्याची दुरुस्ती,नदीवर पोहायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केले काम.
राजाराम बंधाऱ्याची दुरुस्ती,नदीवर पोहायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केले काम.

*****************
कोल्हापूर : कसबा बावडा येथील ऐतिहासिक राजाराम बंधाऱ्याला यंदाच्या पुरामुळे मोठं भगदाड पडलं होतं. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे, नेहमी नदीवर पोहायला येणाऱ्या राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन, स्वखर्चाने या भगदाडाची दुरुस्ती केली आहे.
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा कोल्हापूर जिल्ह्याचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. पण यंदाच्या पुरामुळे बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला कठड्याला एक मोठं भगदाड पडलं होतं. गेली अनेक वर्ष नवीन पुलाच्या कामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक बंधाऱ्याकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलं आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, नेहमी बाराही महिने नदीवर पोहायला येणारे आणि या बंधाऱ्याची काळजी घेणारे राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते पुढे सरसावले. त्यांनी एकत्र येऊन, हे भगदाड स्वतःच्या पैशाने बुजवून टाकलं.
यावेळी, राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे. नवीन पुलाचं काम लवकर सुरू करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर, बंधाऱ्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
या कामात हनुमंत सूर्यवंशी, किरण मोटे, भगवान चव्हाण, विजय रावण, जितु केंबळे, संजय चौगले, विनायक आळवेकर, शिवाजी ठाणेकर, किरण पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कामामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे.
No comments: