गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी हरपवडे पैकी निवाचीवाडी (ता. पन्हाळा) येथे घटना.
गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी हरपवडे पैकी निवाचीवाडी (ता. पन्हाळा) येथे घटना.
-------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
-------------------------
कळे:- हरपवडे पैकी निवाचीवाडी (ता. पन्हाळा) येथे दि.४ रोजी सकाळी गव्याच्या हल्ल्यात रघुनाथ पांडुरंग बरकाळे (वय ४५) हे शेतकरी गंभीर जखमी झाले. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, बरकाळे यांना तत्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरपवडे पैकी निवाचीवाडी येथील बरकाळे हे सकाळी आपल्या ‘रेवटा’ नावाच्या शेतात जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले होते. शेतात पोहोचताच अचानक झुडपातून बाहेर पडलेल्या गव्याने त्यांच्या अंगावर झेप घेत जोरदार धडक दिली. या धडकेत बरकाळे यांच्या छातीस व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात गव्यांचा वावर वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले.
गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सोबत फोटो : सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेली शेतकरी रघुनाथ पांडुरंग बरकाळे.

No comments: