चिपरी परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा धुमाकूळ!

 चिपरी परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा धुमाकूळ!

**********************

जयसिंगपूर :नामदेव भोसले

**********************

चिपरी (ता. शिरोळ) परिसरात बियाणी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने गट नंबर 429, 430, 431 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौणखनिज (मुरुम) उत्खनन सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

ग्रामस्थांच्या मते, सदर ठिकाणी होत असलेल्या उत्खननासाठी शासनाची कोणतीही वैध परवानगी अथवा खनिकर्म विभागाची मंजुरी नाही. शासन महसूल भरण्याची प्रक्रिया व कायदेशीर परवानग्या टाळून मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू असून, त्यामुळे शासन महसुलाचा मोठा अपहार होत आहे.

या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील शेतजमिनींची धूप होऊन पर्यावरणीय तोटा होत आहे. उत्खनन व वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे स्थानिक ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. दिवस-रात्र सुरू असलेल्या डंपर वाहतुकीमुळे रस्त्यांचीही मोठी हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी दाखल केलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेला पूर्णपणे बगल देऊन मुरुम उत्खनन चालू असून, कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 सदर बेकायदेशीर उत्खनन तात्काळ थांबवून दोषींवर गौणखनिज अधिनियम, पर्यावरण कायदे व भारतीय दंडसंहितेनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासन महसुलाची तात्काळ वसुली करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी तक्रारीत नमूद आहे.सदर प्रकार गंभीर असून, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चिपरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासन तात्काळ जागे होऊन कठोर कार्यवाही करते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.