शाहुवाडीत थरकाप उडवणारा उलगडा! — वृद्ध दांपत्याचा ‘प्राण्यांचा हल्ला’ नव्हे, तर खून; सराईत गुन्हेगार विजय गुरव पोलिसांच्या ताब्यात.रोहित फास्टे.
शाहुवाडीत थरकाप उडवणारा उलगडा! — वृद्ध दांपत्याचा ‘प्राण्यांचा हल्ला’ नव्हे, तर खून; सराईत गुन्हेगार विजय गुरव पोलिसांच्या ताब्यात..
----------------------------------
-मलकापूर प्रतिनिधी.
रोहित पास्टे
-----------------------------------
शाहुवाडी तालुक्यातील निनाई परळी (गोळवण वस्ती) येथे घडलेल्या वृद्ध कंक दांपत्याच्या दुहेरी हत्येचा थरकाप उडवणारा उलगडा कोल्हापूर पोलिसांनी केला आहे. सुरुवातीला हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याचा संशय व्यक्त झालेल्या या घटनेचा शेवटी थंड डोक्याने रचलेला खून असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) यास अटक केली आहे.
🔹 घटनेचा मागोवा :
दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सौ. रखुबाई निनु कंक (६५) व निनु यशवंत कंक (७०) हे वृद्ध दांपत्य मृतावस्थेत आढळले. सुरुवातीला हे दोघे हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात मरण पावल्याची शक्यता वर्तवली गेली होती. परंतु घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून मानवी हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने तपासाची दिशा बदलली.
🔹 तपासात उघडकीस आलेले सत्य :
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, स्थानिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध लावला. संशयित विजय गुरव हा अनेक मालमत्ताविरुद्ध गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड असून, काही दिवसांपासून डोंगर कपारीत लपून राहत होता.
तो निनाई परळी येथे आला असता, एकटे राहणारे कंक दांपत्य त्याला आश्रय देईल असा विचार करून त्यांच्या घरी गेला. मात्र निनु कंक यांनी विरोध केल्याने, रागाच्या भरात त्याने लाकडी दांडके आणि दगडाने दोघांचा खून केला, अशी कबुली त्याने दिली आहे.
🔹 आरोपी अटकेत, तपास सुरू :
सदर आरोपीस शाहुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
🔹 प्रशंसनीय कामगिरी :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर आणि अमित सर्जे यांनी या गुन्ह्याच्या उकलमध्ये मोलाचे योगदान दिले

No comments: