कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: भंगारच्या नावाखाली चोरी करणारी टोळी जेरबंद!
कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: भंगारच्या नावाखाली चोरी करणारी टोळी जेरबंद!
-----------------------------
शशिकांत कुंभार
-----------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. भंगार गोळा करण्याच्या नावाखाली चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी तब्बल ११ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ९५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगली फाटा परिसरात सापळा रचला. या सापळ्यातून एका महिंद्रा टेंपोला अडवण्यात आले, ज्यामधून चोरी केलेली कॉपर वायर, तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी सुरेश रतन पडियार, विकी प्रकाश गोसावी आणि राहुल सुरेश पडियार (सर्व रा. रुकडीवाडी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, टोळीतील इतर दोन साथीदार बारक्या आणि संतोष हे अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे
या टोळीने गोकुळशिरगाव, हातकणंगले, शिरोळ, शहापूर आणि शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ११ गुन्हे केले होते. यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या अनेक घटनांचा समावेश आहे.
या यशस्वी कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment