किणी व तासवडे टोलनाक्यांविरोधात मनसे आक्रमक; टोलवसुली तात्काळ थांबवण्याची मागणी.
किणी व तासवडे टोलनाक्यांविरोधात मनसे आक्रमक; टोलवसुली तात्काळ थांबवण्याची मागणी.
-------------------------------
सलीम शेख
-------------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि तासवडे येथील टोलनाक्यांवर सुरू असलेली टोलवसुली तात्काळ थांबवावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसेच्या परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या डेप्युटी इंजिनियर यांना निवेदन दिले आहे.
विजय करजगार यांनी नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले असतानाही प्रवाशांकडून टोल वसूल करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
या संदर्भात बोलताना करजगार म्हणाले, “कागल ते सातारा रस्त्यावर खड्ड्यांची इतकी गंभीर समस्या आहे की 'रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यात आहेत' हेच समजत नाहीये. अशा खराब रस्त्यांसाठी किणी आणि तासवडे टोलनाक्यांवर सुरू असलेली टोलवसुली म्हणजे जनतेची उघड-उघड लूट आहे.”
मनसेने या निवेदनात एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, किणी टोलनाक्याची मुदत आधीच संपलेली आहे, तरीही तिथे टोलवसुली सुरू आहे. हा एक प्रकारे जनतेचा गैरवापर असल्याचे मनसेने म्हटले आहे.
मनसेने यापूर्वीही या टोलनाक्यांविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. शासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी संजय करजगार, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, उत्तम वंदूरे, सम्मेद मुधाळे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment