पुतळा आगमन सोहळ्यासाठी उदगाव परिसरातील शेकडो भीमसैनिक येणार उदगाव येथील बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद.
पुतळा आगमन सोहळ्यासाठी उदगाव परिसरातील शेकडो भीमसैनिक येणार उदगाव येथील बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद.
----------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधि
नामदेव भोसले
----------------------------------------
जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उदगाव येथील श्रीराम मंदिर येथे सर्व समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगमन सोहळ्यासाठी उदगावसह परिसरातून शेकडो भीमसैनिक उपस्थित राहणार असल्याचा निर्धार यावेळी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
गेल्या ५० ते ६० वर्षांपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात नवचैतन्य पसरले आहे.
उदगाव येथील बैठकीत पुतळा समन्वयक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून प्रत्येक गावातील भीमसैनिकांनी या सोहळ्यात सक्रियपणे सहभागी व्हावे. त्यांनी म्हटले की, जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. ही मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण होत आहे.
जेष्ठ नेते बाळासाहेब कांबळे म्हणाले, आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भीम ज्योत परिक्रमा काढली जाणार आहे. ही परिक्रमा प्रत्येक गावात जाईल आणि तिचे स्वागत उत्साहात होईल. २८ तारखेला होणाऱ्या आगमन सोहळ्यात प्रत्येक भीमसैनिकाने कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात संजय सासणे यांनी सांगितले की, जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. यावेळी विशाल भरमे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीत सर्वांनी मिळून आगमन सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सहकार्य करण्याचे संकल्प व्यक्त केले. बैठकीत उपस्थितांनी पुतळा आगमन सोहळ्यासाठी उत्साहाने तयारी सुरू असल्याचे सांगितले आणि प्रत्येक भीमसैनिकाने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीत उदगावसह परिसरातील बौद्ध समाज, चर्मकार समाज आणि मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment