Header Ads

गोकुळ शिरगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव फेटाळला;बार चालकांचा गावात जल्लोष, महिला सन्मान परिषद निराश.

 गोकुळ शिरगाव ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव फेटाळला;बार चालकांचा गावात जल्लोष, महिला सन्मान परिषद निराश.

--------------------------------------

सुपर भारत- संस्कार कुंभार 

----------------------------------------

गोकुळ शिरगाव: (ता. करवीर) गोकुळ शिरगाव येथे महिला सन्मान परिषदेच्या पुढाकारातून दारूबंदीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आला. एकूण ३६६ ग्रामस्थ उपस्थित असलेल्या या सभेत २४ विरुद्ध ३२४ मतांनी दारूबंदीला विरोध दर्शवण्यात आला, तर १८ ग्रामस्थ तटस्थ राहिले. ग्रामसभेच्या या निकालामुळे दारूबंदीच्या बाजूने असलेल्या महिला सन्मान परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली, तर दारूबंदीच्या विरोधात असलेल्या ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

ठरावाच्या बाजूने महिलांचा जोरदार प्रचार, पण अपेक्षित प्रतिसाद नाही.

महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर, महासचिव प्राजक्ता कांबळे, सचिव दिपाली कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दारूबंदीच्या बाजूने जोरदार मोहीम राबवली होती. दारूबंदी गावाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दारूमुळे गावातील शांतता आणि तरुणाईचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निकालानंतर प्रियाताई शिरगावकर यांनी निराशा व्यक्त करत “हा गावाच्या भवितव्याचा प्रश्न असून, आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त केला. महिला सन्मान परिषदेच्या काही महिलांनी गोकुळ शिरगाव हे गाव श्रीकृष्णाची पावन भूमी आहे येथील लोक दारूला प्रोत्साहन देत आहेत म्हणून या गावातील ग्रामस्थांना आपली मुलगी देऊन देऊ नका असे आव्हान करण्यात आले. तसेच ठराव मंजूर करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन महिला सन्मान परिषदेने केले.

हॉटेल कर्मचारी आणि दारूविक्रेत्यांचा ठरावाला विरोध केला आहे.

दारूबंदीचा ठराव फेटाळण्यासाठी दारूविक्रेते आणि हॉटेल लॉबीने ग्रामस्थांवर दबाव आणल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सभेत हॉटेल कर्मचाऱ्यांनी “आमच्या नोकऱ्यांचे काय? आमच्या पोरा-बाळांचे काय?” असे फलक दाखवून दारूबंदीला विरोध केला. दारूबंदी झाल्यास त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे होते.

ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच तटस्थ राहिले आहेत.

या महत्त्वपूर्ण ग्रामसभेत सरपंच चंद्रकांत डावरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. उपसरपंच संदीप पाटील आणि इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य तटस्थ राहिले. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे त्यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे, राजेंद्र गाढवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कनिष्ठ उपनिरीक्षक ज्योती शिंदे, आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण सभेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आरोप-प्रत्यारोप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सभेत निकाल जाहीर झाल्यानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. दारूबंदीच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या गट-तट यांच्यात शाब्दिक वाद झाले. गोकुळ शिरगाव पोलीस प्रशासनाने दोन-तीन वेळा मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दारूबंदीचा ठराव फेटाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि दडपशाही झाली असल्याचा आरोप महिला सन्मान परिषदेने केला आहे.

या निकालामुळे गोकुळ शिरगावमध्ये दारूबंदीचा विषय सध्या तरी थांबला आहे. यापुढील काळात या विषयावर गावातील वातावरण कसे राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

No comments:

Powered by Blogger.