कोल्हापुरात हेवी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नागरिकांची लूट, '५अ' फॉर्मसाठी १० ते १२ हजार रुपयांची मागणी.
कोल्हापुरात हेवी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नागरिकांची लूट, '५अ' फॉर्मसाठी १० ते १२ हजार रुपयांची मागणी.
--------------------------
सलीम शेख
--------------------------
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेवी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने केला आहे. हेवी लायसन्ससाठी आवश्यक असलेला फॉर्म ५अ खासगी ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून १०,००० ते १२,००० रुपयांना दिला जात असून, इतर जिल्ह्यांमध्ये याच प्रमाणपत्रासाठी केवळ ८०० ते ९०० रुपये घेतले जातात, असे संघटनेने म्हटले आहे.
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) यांनी याबाबत कोल्हापूर आरटीओ कार्यालयाला निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या नियमांनुसार हे प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाने देणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या हे काम खासगी ट्रेनिंग स्कूलकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य आणि गरजू वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
संघटनेने मागणी केली आहे की, आरटीओने या लुटीवर तातडीने नियंत्रण आणावे आणि या प्रमाणपत्राचे दर निश्चित करावेत. तसेच, दंडाची रक्कम आणि प्रमाणपत्राचे दर असलेले फलक आरटीओ कार्यालयात लावावेत, जेणेकरून नागरिकांना योग्य माहिती मिळेल. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेने फॉर्म ५ आणि ५अ कार्यालयातच उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सर्वसामान्यांची लूट थांबवता येईल.
हा प्रश्न तातडीने मार्गी लावून गोरगरीब वाहनचालकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दिनेश परमार यांनी केली आहे. यावेळी वाहतूक सेनेचे दत्ता पराकटे (करवीर तालुका प्रमुख), संदीप पाटील ,अरुण पाटील, गणेश वर्दम उपस्थित होते.

No comments: