व्यसनमुक्ती पंधरवड्याच्या निमित्ताने प्रफुल्लित केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम
व्यसनमुक्ती पंधरवड्याच्या निमित्ताने प्रफुल्लित केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम
व्यसनमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ:
_____________________कोल्हापूर : व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या व्यसनमुक्ती पंधरवड्याच्या औचित्याने प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून आज एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत राजश्री शाहू हायस्कूल व पी. एम. श्री विद्यालयात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या वेळी प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देत जीवनात सदैव सकारात्मकता व निरोगीपणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
व्यसनमुक्ती पंधरवडा हा फक्त औपचारिकता नसून संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त करण्याची जनजागृतीची सुरुवात आहे. शाळेच्या पातळीवरूनच हे बीज पेरले गेले तर भावी पिढी निरोगी आणि सक्षम घडेल.या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असे डॉ. अल्फिया बागवान यांनी सांगितले.
आजच्या काळात, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि इतर अमली पदार्थांचे व्यसन ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत, शालेय स्तरावरच व्यसनमुक्तीचे महत्त्व बिंबवणे आवश्यक आहे. प्रफुल्लित केंद्राने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. यांसारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ व्यसनांबद्दलच नव्हे, तर चांगल्या आरोग्याविषयी आणि जबाबदार नागरिकत्वाविषयी देखील जागरूकता निर्माण होते. शपथविधीसारख्या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि ते व्यसनांपासून दूर राहण्यास प्रेरित होतात.असे शाळेतील शिक्षकांनी आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे संयोजन केंद्राच्या संचालिका रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ व श्रावणी पाडळकर यांनी केले.या वेळी राजश्री शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बशीर शिकलगार,पी. एम. श्री महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे,शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला.
No comments :
Post a Comment