पनोरी गावातील वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा, दोन आरोपींना अटक.
पनोरी गावातील वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा, दोन आरोपींना अटक.
----------------------------
सलीम शेख
----------------------------
कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि राधानगरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी दागिने चोरण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पनोरी येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्ध महिलेचा मृतदेह ७ सप्टेंबर, २०२५ रोजी तिच्या घरामागील गोबरगॅसच्या टाकीमध्ये आढळला. त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह टाकला असावा, असा संशय होता. या प्रकरणी, त्यांच्या दत्तक मुलाने, अमित हरी रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करण्याचे आदेश दिले. कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
घटनेच्या रात्री गावात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असल्यामुळे बहुतेक नागरिक मिरवणुकीत सहभागी होते. यामुळे कोणतेही प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नव्हते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. यावेळी त्यांना दोन व्यक्ती, अभिजीत मारुती पाटील आणि कपिल भगवान पातले, या मिरवणुकीदरम्यान परिसराबाहेर फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या वागण्यातही बदल जाणवला.
पोलिसांनी अभिजीत पाटील (वय ३४) आणि कपिल पातले (वय ३४) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ते दोघेही बालपणीचे मित्र असून आर्थिक अडचणीत होते. चिमांती रेवडेकर या एकट्या राहत असून त्यांच्याकडे दागिने असल्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी अनंतचतुर्थीच्या दिवशी, ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० ते १२ च्या दरम्यान, जेव्हा सर्व लोक मिरवणुकीत होते, तेव्हा ही योजना अंमलात आणली.
ते मागच्या दरवाजाने घरात घुसले. महिलेचे तोंड दाबून तिच्या अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने प्रतिकार केला. त्यामुळे त्यांनी डोक्यात मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह साडीत गुंडाळून गोबरगॅसच्या टाकीत फेकून दिला, अशी कबुली त्यांनी दिली.
पुढील कार्यवाही
आरोपी अभिजीत पाटील आणि कपिल पातले यांना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, आणि राधानगरी पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment