वडगांव डवरी गल्ली येथे खून करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद.
वडगांव डवरी गल्ली येथे खून करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद.
पेठवडगाव येथील डवरी गल्ली येथे झालेल्या खुनाच्या घटनेतील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक करून जेरबंद केले आहे.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२० वाजता संभाजी धर्मा साळुंखे (वय ५०) यांचा किरण भिमराव जगताप (रा. यादवनगर, कोल्हापूर) याने लाकडी फळीने डोक्यात प्रहार करून खून केला व घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी मृताची पत्नी मिना संभाजी साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मा. योगेश कुमार साहे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरु केला.
दरम्यान, पथकातील पोलीस अमंलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परिते येथील पोखरणेकर वस्तीमध्ये लपून बसल्याचे समजले. त्यानंतर पथकाने गुप्त सापळा रचून आरोपीस अटक करण्यात यश मिळविले.
चौकशीदरम्यान आरोपी किरण भिमराव जगताप (वय २७) याने संभाजी साळुंखे यांच्यासोबत झालेल्या शब्दिक वादातून मनात राग धरून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपीस वडगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार साहे, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, संदीप पाटील, अमित सर्जे यांनी केली.

No comments: