कवठेमहांकाळ: घाटनांद्रे येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून.
कवठेमहांकाळ: घाटनांद्रे येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून.
-----------------------------
शशिकांत कुंभार
-----------------------------
घाटनांद्रे, सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर घाटनांद्रे येथील एका २८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील विलास शिंदे (वय २८, रा. घाटनांद्रे) या तरुणाचा मृतदेह घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर तिसंगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्याच्या मृतदेहाशेजारीच त्याची मोटरसायकलही मिळाली आहे.
सुनीलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा असून, त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक मोठा दगडही सापडला आहे. याच दगडाने त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
या खुनामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Comments
Post a Comment