कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: गोव्याहून आणलेला बनावट दारूचा साठा जप्त.
कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: गोव्याहून आणलेला बनावट दारूचा साठा जप्त.
---------------------------------
सलीम शेख
----------------------------------
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांवर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत, गोव्याहून महाराष्ट्रात आणला जात असलेला बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर असा एकूण १० लाख ५३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार सो यांनी अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी, पोलीस अंमलदार रुपेश माने आणि विनोद कांबळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार इसाक मुजावर (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) हा टाटा कंटेनरमधून (क्र. MH14-JL8818) गोव्याची बनावट दारू घेऊन जाणार आहे.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने उचगाव ते गडमुडशिंगी रोडवर सापळा रचला. पोलिसांनी आरोपी इसाक खुदबुद्दीन मुजावर (वय ५१) याला कंटेनरसह पकडले. कंटेनरची तपासणी केली असता, केबिनमध्ये विविध ब्रँड्सच्या दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये सिग्नेचर, ब्ल्यू अँड गोल्ड, अमेरिकन प्राईड, रॉयल चॅलेंज, ओल्डमंक आणि इम्पीरीयल ब्ल्यू या विदेशी दारूच्या एकूण ९३ बाटल्या होत्या. या दारूची किंमत ५३ हजार ४७५ रुपये आहे.
पोलिसांनी दारूचा साठा आणि १० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण १० लाख ५३ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी इसाक मुजावरविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपी इसाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाड आणि गुजरात राज्यात चोरी व अपहरण कायद्यांतर्गत १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसारही कारवाई झालेली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, अमित मर्दाने, संजय पडवळ, रुपेश माने आणि विनोद कांबळे यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment