कागल आरटीओ चेकपोस्टवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सर्व्हर डाऊनमुळे वाहनधारक त्रस्त.
कागल आरटीओ चेकपोस्टवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सर्व्हर डाऊनमुळे वाहनधारक त्रस्त.
----------------------------
सलीम शेख
----------------------------
कागल (कोल्हापूर): आज दिनांक १४ सप्टेंबर सकाळी कागल येथील आरटीओ चेकपोस्टवर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना तासन्तास रांगेत अडकून राहावे लागले. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून, वेळ आणि इंधनाचा अपव्यय झाल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळी नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी आणि कर भरणा सुरू होता, मात्र अचानक सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व कामकाज ठप्प झाले. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली. काही वेळातच ही रांग खुप जास्त लांब झाली होती.
याबाबत अनेक वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एका ट्रक चालकाने सांगितले की, "एकतर आम्हाला वेळ काढून कर भरायला यावे लागते. त्यात आता तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे आमचा वेळ तर वाया जातोच, पण डिझेलचाही खर्च वाढतो. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी."
टोल वसुलीवरही नाराजी
काही वाहनधारकांनी टोल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. एका वाहनधारकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "मोठ्या उद्योजकांकडे टोल वसुलीचा ठेका असल्याने ते मनमानी पद्धतीने वसूल करतात. जर वेळेवर कर भरण्यासाठी वाद होतात. पण जेव्हा त्यांच्या सिस्टीममध्ये बिघाड होतो, तेव्हा मात्र आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. यावर कोणीही काहीच बोलत नाही."
या प्रकारामुळे आरटीओ चेकपोस्टवरील काम आणि वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तातडीने लक्ष घालून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
सध्या तरी वाहतूक पूर्ववत सुरू झाली असली, तरी सकाळपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Comments
Post a Comment