उजळाईवाडीच्या शिवराजे प्रतिष्ठानचा आदर्श उपक्रम: तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रींची आरती.
उजळाईवाडीच्या शिवराजे प्रतिष्ठानचा आदर्श उपक्रम: तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रींची आरती.
------------------------------
सलीम शेख
------------------------------
कोल्हापूर उजळाईवाडी : सामाजिक समता आणि सलोखा जपण्यासाठी समाजात दुर्लक्षित राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. याच विचाराने प्रेरित होऊन, उजळाईवाडी येथील शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठान (शिवराजे ग्रुप) ने एक स्तुत्य उपक्रम राबवत तृतीयपंथीयांना गणेशोत्सवात श्रींच्या आरतीचा बहुमान दिला. या कार्यक्रमाला तृतीयपंथी समुदायाने पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावून श्रींची आरती केली, ज्यामुळे एकोप्याचे आणि बंधुत्वाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या विभागीय सदस्या मयुरीताई शिवाजीराव आळवेकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सामाजिक समतेचे कार्य आदर्शवत आहे." यावेळी देशातील पहिल्या सरकारी तृतीयपंथी शिक्षिका रिया मयुरीताई आळवेकर आणि राज्यातील पहिल्या तृतीयपंथी सहल गाईड सुहासिनी मयुरीताई आळवेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले, "तृतीयपंथीयांनाही मन, भावना आणि विचार आहेत. समाजात त्यांना समानतेची वागणूक मिळावी आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना विकासाची संधी मिळावी यासाठी आम्ही गणेश आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व सभासदांनी सहमती दिली."
या सन्मानामुळे तृतीयपंथीयांना मोठा आनंद झाला. मयुरीताई आळवेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "शिवराजे ग्रुपने आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत श्रींच्या आरतीचा बहुमान दिल्यामुळे मनस्वी आनंद झाला आहे."
शिक्षिका रिया आळवेकर यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, "तृतीयपंथीयांना आरतीचा मान देऊन प्रतिष्ठानने एक चांगला पायंडा सुरू केला आहे. याचा आदर्श घेऊन इतर सामाजिक संस्थांनीही अशा दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान द्यावे." सुहासिनी आळवेकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. "अशा विधायक उपक्रमामुळे समाजाने माणूस म्हणून जगण्याची संधी दिली आहे, ज्यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होईल," असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर गावडे, उपाध्यक्ष बंडू लोहार, सचिव राजाराम जाधव, खजिनदार भैरू सातपुते, अभिमन्यू गावडे, जालिंदर कश्यप, अजित गायकवाड, मिलिंद कांबळे, निखिल सुतार, रत्नदीप सातपुते, अक्षय जाधव, अक्षय गावडे
यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाने केवळ गणेशोत्सवाला धार्मिक महत्त्वच दिले नाही, तर सामाजिक सलोखा आणि मानवी मूल्यांचा संदेशही दिला
No comments: